Sim card checks online: आजच्या काळात मोबाईलशिवाय जीवनाची कल्पनाही करणं देखील कठीण झालं आहे. अगदी लहान गावांपासून ते शहरांपर्यंत प्रत्येकाकडे एक तरी मोबाईल आणि त्यात सिमकार्ड असतंच असतं. सोबतच अनेक जण दोन-तीन सिम वापरतात, काही कामासाठी, काही वैयक्तिक वापरासाठी. पण कधी विचार केलाय का, की तुमच्या नावावर अजून वेगळे सिमकार्ड्स पण चालू असू शकतात का? आणि तुम्हाला त्याची कल्पनाही नाही?
याचाच गैरफायदा घेत आज अनेक फसवणुकीच्या घटना घडत आहेत. बऱ्याचदा लोकांच्या नकळत त्यांच्या आधारकार्डावर दुसऱ्यांनी सिमकार्ड घेतलेलं असतं. आणि त्या सिमचा वापर कुठल्या गुन्हेगारी कामासाठी झाला, तर सर्व जबाबदारी संबंधित व्यक्तीवरच येते. म्हणूनच, स्वतःची जबाबदारी ओळखून आपल्या नावावर रजिस्टर असलेल्या सर्व सिमकार्ड्सची माहिती वेळोवेळी तपासणं खूप गरजेचं झालं आहे.
तुमच्या नावावर किती सिमकार्ड्स चालू आहेत? कसं तपासाल?
यासाठी केंद्र सरकारने एक अधिकृत पोर्टल सुरू केलं आहे, ज्याचं नाव आहे Sanchar Saathi. या पोर्टलच्या मदतीने तुम्ही सहजपणे आणि अगदी काही मिनिटांतच तुमच्या नावावर किती सिमकार्ड्स आहेत हे माहित करून घेऊ शकता.
स्टेप बाय स्टेप प्रक्रिया:
- आधी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये https://www.sancharsaathi.gov.in ही वेबसाइट उघडा.
- त्यानंतर मुख्य पेजवर तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
- आता OTP तुमच्या मोबाईलवर पाठवला जाईल, तो टाकून तुम्ही पुढील प्रक्रिया करा.
- आता इथे तुमच्या नावावर नोंदणीकृत असलेले सगळे मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतील.
- त्यात कोणते सिम तुमच्या माहितीत नसतील किंवा वापरात नसतील, तर ‘Report’ किंवा ‘Deactivate’ या पर्यायांवर क्लिक करून त्या नंबरची माहिती सबमिट करा.
जर एखादं सिम तुमच्या नावावर आढळलं आणि ते तुमचं नसेल तर काय?
अशा परिस्थितीत प्रथम त्या मोबाईल नंबरची माहिती संबंधित टेलिकॉम कंपनीला द्या. त्यांच्याकडे अर्ज करून हे सिमकार्ड बंद करण्याची विनंती करा. तरीही काहीतरी वेगळं किंवा संशयास्पद वाटत असेल तर, तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात त्याबद्दल तक्रार दाखल करा. काही वेळा हे सिम फ्रॉड कामांमध्ये देखील वापरण्यात आलं असल्याची शक्यता असू शकते, त्यामुळे त्यावर त्वरित कारवाई करणं हेच तुमच्यासाठी योग्य असेल.
सिमकार्डचा गैरवापर कसा होतो?
फसवणूक करणाऱ्या टोळ्या दुसऱ्याच्या ओळखपत्रांचा वापर करून सिमकार्ड्स घेतात. मग त्याचा वापर फेक कॉल्स, बँक फसवणूक, OTP स्कॅम्स किंवा ऑनलाईन आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी करतात. या सर्व गोष्टी तुमच्या नावावर सिम कार्ड रजिस्टर असल्यामुळे तुम्हालाच अडचणीत आणू शकतात.
कधी कधी तुम्हाला KYC अपडेट करण्याच्या नावाखाली कॉल येतो आणि तुम्ही जर आधार कार्ड माहिती दिली, तर त्याचाच गैरवापर करून नवीन सिम घेतलं जातं. त्यामुळे अशा कोणत्याही कॉलवर माहिती देण्याआधी दोनदा विचार करा आणि शक्यतो कधीच वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
मोबाईल नंबर हरवू नका
आज आधार कार्डपासून ते बँक खात्यांपर्यंत, प्रत्येक गोष्ट मोबाईल नंबरशी लिंक असते. जर तुमचा मुख्य नंबर हरवला किंवा बंद झाला, तर तुम्हाला OTP येणार नाही, बँक व्यवहार करता येणार नाहीत, आणि सरकारी योजनांचाही लाभ घेता येणार नाही. त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर जपून ठेवा. तो फक्त संपर्काचं साधन नाही, तर ती तुमची डिजिटल आयडेंटिटी आहे.
आजकाल सुरक्षितता ही आपल्याच हाती आहे. फसवणुकीपासून स्वतःला वाचवायचं असेल, तर जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे. दर काही महिन्यांनी एकदा तरी तपासा, तुमच्या नावावर कोणकोणती सिमकार्ड्स चालू आहेत.
