
Prayagraj | उत्तर प्रदेशच्या धरतीवर शतकातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा प्रयागराजमध्ये (Prayagraj) मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या अलोट गर्दीने पार पडला. या महाकुंभमेळ्यात तब्बल 60 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी गंगास्नान केल्याची माहिती आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि जगभरातील भाविकांनी येथील गंगा नदीत जाऊन डुबकी मारली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योगपतीही प्रयागराजमध्ये जाऊन भक्तीरसात न्हाऊन आल्याचं पाहायला मिळालं. या महाकुंभमेळ्यात हजारो कोटींची उलाढाल झाली असून अगदी लिंबाच्या काडीचे दंतमंजन विकण्यापासून ते अनेक उद्योग पाहायला मिळाले. त्यामध्ये, येथील नाविक म्हणजे होडी चालवणाऱ्या व्यवसायिकांनाही महाकुंभमेळ्याने मोठी कमाई करुन दिली असून अशाच एका नाविक कुटुंबाची सक्सेस स्टोरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी सांगितली आहे.
45 दिवसांत 30 कोटी कमावले
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत माहिती देताना येथील एका नाविकाची सक्सेस स्टोरी सांगितली. एका नाविक कुटुंबीयांने 45 दिवसांत 30 कोटी रुपयांची कमाई केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, त्यावेळी सर्वांनी बाक वाजवून दाद दिली. येथील नाविकांचे शोषण होत आहे, त्यांना चांगल्या सुविधा दिल्या जात नाहीत असा आरोप विरोधकांनी केला. मात्र, येथील एका नाविक कुटुंबाने 45 दिवसांत 30 कोटी रुपयांची कमाई केली. या नाविक कुटुंबाकडे 130 नौका (होडी) आहेत. एका नौकेने 45 दिवसांत 23 लाख रुपयांचा गल्ला जमवला. जवळपास 50 ते 55 हजार रुपये प्रतिदिवस कमाई या नौकाचालक नाविकांनी केल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.