International Day of Yoga | योगसाधना निरोगी जीवनाची गुरुकिल्ली -प्राचार्य चौरे

श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय  योगदिन साजरा

योगविद्या ही आपल्या देशाने संपूर्ण विश्वाला दिलेली अनमोल देणगी आहे. या योगसाधनेला सुमारे पाच हजार वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. योग हा प्राचीन भारताचा अनमोल ठेवा असून योगसाधना हि निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन प्राचार्य प्रकाश चौरे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शुभेच्छा देवून त्यांना मार्गदर्शन करतांना प्राचार्य चौरे बोलत होते. ते म्हणाले की, सध्याच्या धावत्या युगात ताणतणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आधुनिक विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन शोध लागत असल्यामुळे प्रत्येकाच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले आहेत. त्याचा परिणाम जेवणाच्या ताटातील चौरस आहार देखील बदलला आहे. त्यामुळे आपल्याला विविध व्याधींना सामोरे जावे लागत असून मधुमेह, उच्च रक्तदाब हि तर जागतिक समस्या होवून बसली आहे. अशा व्याधींपासून आपला बचाव करण्यासाठी व आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी नियमित योग साधना हि काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी नियमित योगसाधना करून आपली प्रकृती सुदृढ व निरोगी ठेवावी असा मौलिक सल्ला दिला.              

 यावेळी योग शिक्षिका सौ. मेघा जोशी, सौ. योगिता लगड, सौ. अनिता गरुटे यांनी योगासनाची विविध प्रात्यक्षिक करून दाखवत विद्यार्थ्याकडून देखील योगासने करून घेतली.यावेळी विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील योगासने केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख विठ्ठल वसावे, देवेंद्र भोये, सांस्कृतिक विभाग प्रमुख अशोक गांगुर्डे, एम.सी. व्ही.सी. विभाग प्रमुख आप्पासाहेब आगवन, ज्यु. कॉ. विभाग प्रमुख राजेंद्र सोनवणे तसेच सर्व सेवकांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजामुराद शेख यांनी केले तर आभार योगेश सावळा यांनी मानले.

Sharing Is Caring:

Leave a Comment